
बेळगाव : बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी (दि. २२) सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर तिलारी धरणातील पाणी राकसकोप जलाशयात आणण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.
तिलारीचे पाणी बेळगावला उपलब्ध झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पाण्याची उपलब्धता, पाणीवाटप आणि प्रस्तावाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे.
बेळगाव शहरासह सीमाभागातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तिलारी पाणी योजनेबाबत सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे शहरवासीयांसह सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta