
‘नराधमाला फाशी द्या, न्याय मिळालाच पाहिजे’च्या घोषणांनी दणाणले शहर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : “फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या… न्याय हवा आहे, न्याय मिळालाच पाहिजे!” अशा संतप्त घोषणांनी शुक्रवारी बेळगाव शहर दणाणून गेले. सांगली-कुपवाड येथील केसरेकर दांपत्याच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ समस्त मराठा समाज आणि मराठी भाषिक एकवटले. सरदार मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासह अनाथ झालेल्या दोन मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील केसरेकर कुटुंब कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे वास्तव्यास होते. मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी निशा केसरेकर हे मनोज व मनाली या दोन मुलांसह कुपवाड एमआयडीसी परिसरात राहत होते. किरकोळ वादातून फरीद अब्दुल शेख याने धारदार शस्त्राने दोघांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे दोन चिमुरड्या मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.
या कष्टकरी कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित व्हावे, या मागणीसाठी बेळगावसह सीमा भागातील शेकडो मराठी भाषिक मोर्चात सहभागी झाले. मोर्चात महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संवेदनशील प्रकरणासाठी अॅड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, खटल्याची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात करून जलदगतीने न्याय द्यावा, तपास विशेष तपास पथकाकडे सोपवावा आणि आरोपींविरुद्ध तातडीने आरोपपत्र दाखल करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. कायद्यानुसार फाशीची शिक्षा लागू होत असल्यास तीही देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
अनाथ मुलांच्या भवितव्याची शासनाने जबाबदारी घ्यावी
मनाली आणि मनोज या दोन्ही मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. दोन्ही मुलांना प्रत्येकी दरमहा १० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार शासकीय सेवेत संधी मिळण्यासाठी आवश्यक शासकीय मदत व सवलतींचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
फिर्यादी, दोन्ही मुले आणि महत्त्वाच्या साक्षीदारांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण देण्यात यावे. केसरेकर कुटुंब बेळगाव जिल्ह्यातील असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात विशेष लक्ष घालून महाराष्ट्र व कर्नाटक शासन तसेच संबंधित गृह विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
सांगलीत धरणे आंदोलनाचा निर्धार
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला. बेळगावातील आंदोलनानंतर केसरेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सांगली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह मराठी भाषिक रवाना होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मोर्चामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व युवा नेते आर. एम. चौगुले, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, अमित देसाई, सागर पाटील, गुणवंत पाटील, भरत पाटील, उमेश पाटील, किरण हुद्दार, सचिन केळवेकर, प्रशांत भातकांडे, सुनील जाधव, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवानी पाटील, सुधा भातकांडे, माधुरी बिर्जे, यांच्यासह मराठी भाषिक नागरिक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
“केसरेकर कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta