Friday , August 21 2026
Breaking News

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा

Spread the love

 

मुदतठेवींचे नूतनीकरण करण्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांचे आवाहन

बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून सभासदांना यंदा १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांना अधिक बळकटी देण्यासाठी मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींचे नूतनीकरण करून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी केले.

बँकेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत मरगाळे यांनी बँकेच्या गतवर्षातील कामकाजाचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला.

बँकेचे सध्या ८ हजार ७५१ सभासद असून भागभांडवल १ कोटी ४८ लाख ८९ हजार रुपये आहे. राखीव व इतर निधी १० कोटी ८४ लाख ६१ हजार रुपये आहे. बँकेकडे ५५ कोटी ४० लाख ५९ हजार रुपयांच्या ठेवी असून २९ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपयांची विविध प्रकारे गुंतवणूक करण्यात आली आहे. बँकेचे खेळते भांडवल ७१ कोटी ७३ लाख ६० हजार रुपयांवर पोहोचले आहे.

सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँकेने ३८ कोटी ५४ लाख ७६ हजार रुपयांचे कर्जवितरण केले आहे. त्यामुळे सभासदांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतानाच बँकेने नफ्याची कामगिरीही कायम राखली आहे.

आधुनिक बँकिंग सुविधांवर भर

बँकेकडून ग्राहकांना कोअर बँकिंग, एसएमएस सेवा यासह विविध आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमितपणे व्याज व कर्जाचे हप्ते भरणाऱ्या कर्जदारांना व्याजदरात ०.७५ टक्के सूट देण्यात येत असल्याची माहितीही मरगाळे यांनी दिली.

बँकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी ठेवीदारांचे सहकार्य महत्त्वाचे असून मुदत पूर्ण झालेल्या ठेवींचे नूतनीकरण करून ठेवीदारांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन नारायण पाटील, संचालक राजेंद्र पवार, विजय पाटील, राजू मरवे, व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर यांच्यासह बँकेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

Spread the love    बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. …