Friday , August 21 2026
Breaking News

गर्लगुंजीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; ४३ वर्षांनंतर एकत्र येत शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त

Spread the love

 

गर्लगुंजी : गर्लगुंजी गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या १९८१-८२ च्या इयत्ता सातवीच्या आणि ज्योतिराव फुले विद्यालयाच्या १९८३-८४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्शवत आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

जानेवारी महिन्यात तब्बल ४३ वर्षांनंतर सर्व वर्गमित्रांनी एकत्र येऊन एका स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील गुरुजनांना तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

या मेळाव्यातच आपण ज्या शाळांमध्ये शिकलो, त्या शाळांना काहीतरी भेटवस्तू द्यावी, असे सर्वांनी ठरविले होते. त्यानुसार या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मराठी प्राथमिक शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले बेंच भेट स्वरूपात दिले. तर आपल्या माध्यमिक विद्यालयाच्या, ज्योतिराव फुले विद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या कंपाऊंडसाठी आवश्यक असलेले मुख्य गेट बनवून दिले आहे.

आपल्या शाळेविषयी असलेली कृतज्ञता या भेटवस्तूंच्या रूपाने व्यक्त करून या माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या व इतर बॅचच्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे या बॅचचे सर्व विद्यार्थी अतिशय कष्टातून शिकलेले असले तरी आज ते आपापल्या क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करत आहेत. या बॅचमधील अनेकजण माध्यमिक व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर काहीजण सेनादल, पोलीस दल, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.

या उपक्रमाबद्दल दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि एस.डी.एम.सी. कमिटीने माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आहे.

यावेळी मराठी प्राथमिक शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्ष श्री. संतोष पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेसाठी उत्तम प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विकासासाठी हातभार लावावा, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदर बॅचचे विद्यार्थी श्री. सुरेश भातकांडे, पुंडलिक मेलगे, मल्लाप्पा वारनुरकर, बी.के. कोलेकर, कल्लाप्पा भेंडीगिरी, शिवाजी पाटील, संतोष पाटील, मोहन गोरे, विलास जाधव, शिवाजी भक्तुरी, सुबराव पाटील, पी.डी. कुंभार, प्रकाश गुंजीकर, सुहास पाटील, प्रताप पाटील, रमाकांत पाटील, परशुराम पाटील, राजेंद्र हंपन्नावर, दत्तू भातकांडे, पी.आर. कुंभार, एल.डी. पाटील व इतर सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कुपवाड हल्ल्यातील जखमी मोहन केसरेकर यांचाही मृत्यू

Spread the love  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *