Wednesday , August 19 2026
Breaking News

कुपवाड हल्ला प्रकरण : उद्या खानापुरात म. ए. समितीची तातडीची बैठक

Spread the love

 

खानापूर : कुपवाड (सांगली) येथे गत १५ ऑगस्ट २०२६ रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर दांपत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या थरारक घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली असून, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने झालेला हा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक असून, या घटनेमुळे केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या क्रूर हल्ल्यामुळे दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपले असून, ही दोन्ही मुले पूर्णपणे पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
उद्या तातडीची बैठक आणि पुढील दिशा:
या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या, गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत मुख्यत्वे खालील मागण्यांवर विचारविनिमय करून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्चित केले जाईल:
१. या अमानुष कृत्यातील आरोपीला लवकरात लवकर कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी.
२. आई-वडील गमावलेल्या दोन्ही अनाथ मुलांचा संपूर्ण सांभाळ व जबाबदारी शासनाने उचलावी.
या मागण्यांचे अर्ज खानापूरचे तहसीलदार, पोलीस प्रशासन, बेळगाव जिल्हाधिकारी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांना सादर केले जाणार आहेत. या संदर्भातील पुढील दिशा ठरवण्यासाठी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्याच्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

Spread the love  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *