

खानापूर : हेब्बाळ येथील दुर्दैवी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार खानापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मिरज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमी मोहन नागो केसरेकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

मोहन केसरेकर हे मिरज शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असून सध्या लाईफ सपोर्टिंग सिस्टीमवर आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची कन्या मनाली मोहन केसरेकर हिचीही भेट घेऊन तिच्याशी चर्चा केली.
यानंतर मनाली केसरेकर आणि श्रीहरी केसरेकर यांना सोबत घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची भेट घेतली. यावेळी एसपी दोषी यांनी मनाली केसरेकर यांना या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू, असे आश्वासन दिले. तसेच कुटुंबीयांनी कोणतीही काळजी करू नये, असेही त्यांनी सांगितले.
केसरेकर कुटुंबाला तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याबाबत जिल्हाधिकारी, सेवाभावी संस्था, पोलीस विभाग तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे एसपी दोषी यांनी सांगितले.
मनाली केसरेकरशी संवाद साधताना, “तुला कधीही गरज वाटली तर माझ्या कार्यालयात ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वासही एसपी तुषार दोषी यांनी दिला.
यावेळी प्रसाद पाटील, साईश सुतार, संजय बावकर, म्हात्रू गुरव आणि सुरेश भाऊ यांच्यासह खानापूर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta