

अभय पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्याग्रह; भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेला थेट आव्हान
बेळगाव : भ्रष्टाचाराविरोधात भाजपने उभारलेल्या आंदोलनाला आता बेळगावातच प्रतिआव्हान मिळाले आहे. काँग्रेसचे मंत्री बी. नागेंद्र यांच्या कथित भ्रष्टाचारावरून भाजपकडून राजीनाम्याची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन सुरू असतानाच, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याविरोधातील कथित भ्रष्टाचार व उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांवरून सामाजिक कार्यकर्त्यांनीही सत्याग्रहाचे हत्यार उपसले आहे. ‘भ्रष्टाचाराला पक्षाची ढाल का?’ असा थेट सवाल करीत आंदोलकांनी भाजपच्या भूमिकेवरच निशाणा साधला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कन्नड साहित्य भवनासमोर बुधवारी बेळगाव शहरातील रहिवाशांच्या वतीने धरणे सत्याग्रह करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजकुमार टोपणनावर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत दक्षिण आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘नागेंद्रांवर बोलण्यापूर्वी घरातील आरोपांचे उत्तर द्या’
यावेळी सुजित मुळगुंद यांनी भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेवर जोरदार हल्ला चढविला. “मंत्री बी. नागेंद्र यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपला आपल्या पक्षातील दक्षिण आमदारांविरोधातील आरोप दिसत नाहीत का? भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नेत्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील आरोपांवर भूमिका स्पष्ट केल्यानंतरच दाखवावा,” असा घणाघात त्यांनी केला.
दक्षिण आमदारांविरोधात कथित अवैध मालमत्ता व भ्रष्टाचारासंदर्भात मागील काही वर्षांपासून लोकायुक्त तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचा दावा मुळगुंद यांनी केला. या आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘राजीनामा घ्या; पक्षातूनही हकालपट्टी करा’
“भाजपला भ्रष्टाचाराविरोधात खरोखरच लढायचे असेल, तर केवळ विरोधकांवर आरोप करून चालणार नाही. दक्षिण आमदारांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्याविरोधातही आंदोलन करावे आणि आरोप सिद्ध झाल्यास पक्षातून हकालपट्टीची भूमिका घ्यावी,” अशी मागणी मुळगुंद यांनी केली.
आंदोलकांनी यावेळी कथित अनधिकृत मायनिंग, शेतकरी व सरकारी जमिनींसंदर्भातील आरोप, विविध संस्थांच्या आर्थिक व्यवहारांबरोबरच शहरातील काही सार्वजनिक प्रकल्पांच्या दुरवस्थेचे मुद्दे उपस्थित केले.
१,७०० घरकुलांचा प्रश्न ऐरणीवर
स्लम बोर्डाच्या घरकुल योजनेचाही आंदोलकांनी समाचार घेतला. सुमारे १,७०० घरकुलांपैकी केवळ २०० हून अधिक घरकुलांचे वाटप झाले असून उर्वरित घरकुले वर्षानुवर्षे पडून असल्याचा दावा करण्यात आला. जनतेच्या पैशातून उभारलेली घरे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
कला भवन आणि खासबाग भाजी मार्केटच्या सद्यस्थितीवरूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्यात आले. शहराच्या विकासाचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात सार्वजनिक सुविधांची अवस्था बिकट का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
‘भ्रष्टाचाराविरोधात लढा असेल तर तो सर्वांसाठी समान असावा’
राजकुमार टोपणनावर यांनी भाजपला थेट आव्हान दिले.
“राज्यभर मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आंदोलन करीत आहे. मग आपल्या पक्षातील दक्षिण आमदारांविरोधातील आरोपांवर मौन का? भ्रष्टाचार हा विरोधकांच्या पक्षात असेल तर गुन्हा आणि स्वतःच्या पक्षात असेल तर मौन – असा दुहेरी निकष जनतेला मान्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
“भाजपला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे असेल तर आधी दक्षिण आमदारांचा राजीनामा घेऊन दाखवावा,” असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, या आंदोलनामुळे बेळगावातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. एकीकडे विरोधकांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील नेत्यांवरील आरोपांबाबत मौन, या मुद्द्यावरून भाजपला आगामी काळात आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागण्याची शक्यता आहे.
आंदोलनात अनिल उपरी, युवराज तळवार, साद्दाम तहसीलदार, सिद्धार्थ चौहान, सचिन तळवार, सलीम सनदी, आनंद पूजारी, बलराम संगोळी, आसिफ मुल्ला, आशीष पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta