Wednesday , August 19 2026
Breaking News

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात; कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी 25 हजारांची मदत

Spread the love

 

येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या हणमंत कुगजी आणि त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांनी जमखंडी येथील कन्नड साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

जमखंडी येथील साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नी वैभवी व्ही. देशपांडे यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असून, त्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या उपचाराची माहिती हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला यांना मिळताच त्यांनी तातडीने देशपांडे कुटुंबीयांची भेट घेऊन २५ हजार रुपयांची मदत केली.

विशेष म्हणजे देशपांडे हे कन्नड भाषिक साहित्यिक आहेत. मात्र, भाषा, जात अथवा धर्माचा कोणताही भेद न करता कुगजी दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हणमंत कुगजी यांनी यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. येळ्ळूर येथील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या मुलीला उपचारासाठीही त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. कोरोना काळात त्यांनी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, औषधे व इतर साहित्य उपलब्ध करून दिले होते.

मदतीच्या कार्यात पत्नीचीही खंबीर साथ

हणमंत कुगजी यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांची नेहमीच खंबीर साथ राहिली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असलेल्या कुटुंबातून पुढे आलेल्या कुगजी यांनी गरजूंच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळेच शक्य असेल तेव्हा गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सध्या अनेकदा भाषिक किंवा अन्य भेदांमुळे मदतीपासून काही जण वंचित राहतात. मात्र, माणुसकी हीच खरी ओळख मानून कुगजी दाम्पत्याने कन्नड साहित्यिकाच्या कुटुंबाला केलेली मदत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारी ठरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

नवतरंग कार्निव्हल 2026 : ‘भारताची सांस्कृतिक विविधता’ रॅम्प वॉकमधून साकार

Spread the love  बेळगाव : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत के.एल.एस. गोगटे कॉलेज ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *