


बेळगाव : बेळगाव शहरातील शाहापूर येथील नाथ पै चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना महापालिकेचे अभियंते आणि अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील नाथ पै चौक परिसरात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत होते. यावेळी तेथील काही व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसह अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर जखमींच्या वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नोंद करण्यात आली होती.
शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणी शनिवारी दुपारी पुन्हा हालचालींना वेग आला. कर्तव्य बजावणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली काही जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करत असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta