Saturday , October 24 2026
Breaking News

अन्नभाग्यच्या जोंधळ्याचा दर्जा निकृष्ट! ग्राहकांमध्ये नाराजी, धान्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना तांदळासोबत जोंधळ्याचे वितरण केले जात आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून वितरित करण्यात येणाऱ्या जोंधळ्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाचा जोंधळा दिला जात असल्याची तक्रार करत अनेक ग्राहकांनी तो स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहक आणि दुकानदार यांच्यात मतभेद निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवत आहे.

अन्नभाग्य योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरविले जाते. अनेक कुटुंबांची दैनंदिन अन्नाची गरज या योजनेतील धान्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून धान्य वितरणाच्या पद्धतीत बदल करून तांदळासोबत जोंधळ्याचेही वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यातच जोंधळ्याचा दर्जा समाधानकारक नसल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दहा किलो धान्यात सात किलो तांदूळ, तीन किलो जोंधळा

रेशनकार्डधारकांना केवळ तांदूळ न घेता त्यासोबत निर्धारित प्रमाणात जोंधळाही स्वीकारावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, दहा किलो तांदळाऐवजी सात किलो तांदूळ आणि तीन किलो जोंधळा वितरित केला जात आहे. मात्र, मिळणारा जोंधळा वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. हा जोंधळा खाण्यास योग्य नसेल, तर तो स्वीकारून करायचे काय, असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत.

दुकानदारही अडचणीत

सरकारच्या निर्देशानुसार धान्य वितरण करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांवर आहे. त्यामुळे ग्राहकांनी जोंधळा स्वीकारण्यास नकार दिल्यास दुकानदारांसमोरही पेच निर्माण होत आहे. एका बाजूला सरकारी नियमांनुसार धान्य वितरण करण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा विरोध, अशा कात्रीत दुकानदार सापडले आहेत. परिणामी, धान्य वितरण प्रक्रियेत अनावश्यक वाद निर्माण होत आहेत.

धान्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी

अन्नभाग्य योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या तांदूळ आणि जोंधळ्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. गरजू कुटुंबांना वितरित करण्यात येणारे धान्य दर्जेदार आणि वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन धान्याचे नमुने तपासावेत, तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला महत्त्वाचे वळण; २६ ऑक्टोबरला बेळगावात मुख्यमंत्र्यांची बैठक

Spread the love  प्रतिटन ५,५०० रुपये दराच्या मागणीवर चर्चा होणार; शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *