Wednesday , August 19 2026
Breaking News

नवतरंग कार्निव्हल 2026 : ‘भारताची सांस्कृतिक विविधता’ रॅम्प वॉकमधून साकार

Spread the love

 

बेळगाव : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत के.एल.एस. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बेळगावीच्या बी.कॉम. विभागातील हॉबी क्लबतर्फे वेदांत फाउंडेशन, बेळगाव यांच्या सहकार्याने ‘नवतरंग कार्निव्हल 2026 – रॅम्प वॉक स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. ‘भारताची सांस्कृतिक विविधता’ या विषयावर 14 ऑगस्ट रोजी के.के. वेणुगोपाल ऑडिटोरियम, प्लॅटिनम ज्युबिली बिल्डिंग येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत महाविद्यालयातील बी.कॉम., बीबीए, बीसीए आणि एम.कॉम. विभागातील विद्यार्थ्यांच्या एकूण 17 संघांनी सहभाग घेतला. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा, संस्कृती, परंपरा आणि कलांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी भारताच्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेचे प्रभावी दर्शन रॅम्पवर घडविले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते अरुणाचल प्रदेश या विस्तीर्ण भूमीत काही किलोमीटरवर भाषा, खानपान, संस्कृती आणि वेशभूषा बदलताना दिसते. आजचा हा रॅम्प वॉक केवळ फॅशन किंवा मॉडेलिंगपुरता मर्यादित नसून, आपल्या समृद्ध वारशाचा जिवंत उत्सव आहे. वेगवेगळ्या धर्मांचे आणि संस्कृतींचे असलो तरी ‘भारतीय’ या एकाच धाग्याने आपण जोडलेलो आहोत. आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी आहे.”

स्पर्धेत बी.कॉम. विभागातील कपिल आणि त्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 6 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. यापैकी 4 हजार रुपयांचे प्रायोजन वेदांत फाउंडेशनने, तर 2 हजार रुपयांचे प्रायोजन के.एल.एस. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सने केले.

बीसीए विभागातील सान्वी एम. आणि त्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर बीबीए विभागातील अक्षय कांगो आणि त्यांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांकाच्या संघाला ट्रॉफी, प्रमाणपत्र व 4 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 2 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

‘उत्कृष्ट वेशभूषा’ या विभागात कु. श्रेया इतागीकर, कु. नैना के. आणि कु. रेणुका सायबन्नवर यांना विशेष पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाला वेदांत फाउंडेशनचे संस्थापक सतीश पाटील, अध्यक्षा जयश्री पाटील, समन्वयक डॉ. एस. व्ही. जवळकर, समन्वयक प्रा. नयना रायचूर, बी.कॉम. सहायक समन्वयक प्रा. अश्विनी जोशी उपस्थित होते. यावेळी अनुराधा पाटील यांनी वेदांत फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. पाहुण्यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून कु. अर्चना पाटणेकर आणि श्रीमती प्रतिभा हुल्लप्पनवर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे समन्वयन हॉबी क्लबच्या समन्वयक प्रा. वेदावती कट्टी यांनी केले.

या उपक्रमासाठी ॲड. सुधीर चव्हाण, संगीता कुलकर्णी, शैला लोखंडे, आस्मा नाईक, जयश्री पाटील आणि अनुराधा तारीहाळकर यांनी आर्थिक योगदान दिले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, देणगीदार तसेच वेदांत फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम भारताची सांस्कृतिक विविधता, समृद्ध परंपरा आणि राष्ट्रीय एकतेचे सुंदर दर्शन घडविणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव महापालिका बरखास्तीच्या उंबरठ्यावर?

Spread the love  प्रादेशिक आयुक्तांची कठोर भूमिका; आयुक्तांकडून तीन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला सत्ताधारी-विरोधकांच्या संघर्षाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *