

बेळगाव : शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी धडक मोहीम राबवत एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघांना अटक केली. सीसीबी, काकती आणि मरिहाळ पोलिसांनी गांजा विक्री, मटका जुगार आणि बेकायदा दारू विक्रीविरोधात ही कारवाई केली.
रामतीर्थनगर येथील केएससीए मैदानाजवळ ऑटो रिक्षातून गांजा विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या अख्तर युसूफ शेख (४२) याला सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १४८ ग्रॅम गांजा आणि सुमारे २० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत देवगिरी गावातील स्मशानभूमीजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मटका जुगार चालवणाऱ्या भरमप्पा वैजू कुंबरगी (२८) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, चंदूर गावातील होळेम्मादेवी ढाब्याजवळ परवानगीशिवाय दारू विक्री करणाऱ्या बलप्पा द्यमप्पा नित्तूर (४२) याच्यावर मरिहाळ पोलिसांनी कारवाई केली. त्याला अटक करून त्याच्याकडून व्हिस्कीचे ८८ टेट्रा पॅक जप्त करण्यात आले.
या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta