Wednesday , August 19 2026
Breaking News

बेळगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात तालुका म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार

Spread the love

 

बेळगाव : पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे.

बेळगाव तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाला आता अवघा महिना शिल्लक असल्याने उत्सवापूर्वी या रस्त्यांची डागडुजी आणि आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते वाहतुकीस योग्य करावेत, अशी मागणी समिती करणार आहे.

शासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि गणेशोत्सवापूर्वी खराब झालेल्या सर्व प्रमुख संपर्क रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे.

या निवेदन देण्याच्या कार्यक्रमासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण व घटक समित्यांचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिक नागरिकांनी गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नागेंद्रांवर बोट, मग दक्षिण आमदारांवर मौन का?

Spread the love  अभय पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्याग्रह; भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेला थेट आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *