

२० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही कुचकामी
बेळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या जलाशयांपैकी एक असलेल्या हिडकल जलाशयाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. जलाशयाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले २० हून अधिक सुरक्षारक्षक कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संवेदनशील जलाशयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हिडकल जलाशय सिंचनासह पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हजारो नागरिकांच्या जीवनाशी आणि शेतीच्या पाण्याशी निगडित असलेल्या या जलाशयाच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणे गंभीर बाब आहे. मात्र, प्रत्यक्षात जलाशय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था
जलाशयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची अवस्था बिकट झाली असून दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिणामी जलाशय परिसरात ये-जा करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. संवेदनशील ठिकाणी प्रवेश नियंत्रणाची व्यवस्था मजबूत असणे अपेक्षित असताना सध्याची परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रवेश नियंत्रणाच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही अपेक्षित पावले उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
अनुचित घटना घडण्यापूर्वी जागे व्हा!
जलाशयासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत झालेली छोटीशी चूकही भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे प्रस्ताव, मंजुरी किंवा प्रशासकीय प्रक्रियेच्या प्रतीक्षेत न राहता धोकादायक ठिकाणी तात्पुरती सुरक्षा व्यवस्था उभारणे, प्रवेश नियंत्रण कडक करणे आणि तुटलेल्या प्रवेशद्वाराची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
हिडकल जलाशयाची सुरक्षा ही केवळ पाटबंधारे विभागाची जबाबदारी नसून हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षाव्यवस्थेची तातडीने पाहणी करावी, कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीची तपासणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta