Monday , August 17 2026
Breaking News

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील दाम्पत्यावर हातोडी आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत मनीषा मोहन केसरेकर (वय 37) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी फरीद अब्दुल शेख (वय 52) याला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मोहन केसरेकर हे गवंडी काम करत असून गेल्या काही काळापासून कुपवाड एमआयडीसी परिसरात कुटुंबासह राहत होते. विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे त्यांनी घर बांधले होते. पत्नी मनीषा, 11 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा असा त्यांचा परिवार होता.

शेजारी राहणाऱ्या फरीद शेख यांच्याशी कचरा टाकण्याच्या कारणावरून यापूर्वीही किरकोळ वाद झाले होते. शनिवारी (15 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.

यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर फरीद शेख याने हातोडी आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहन यांच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करण्यात आला, तर मनीषा यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मनीषा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहन यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शोध घेत एका पडक्या घरातून फरीद शेख याला ताब्यात घेतले.

दरम्यान, या घटनेनंतर मिरज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी विविध हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा बंदोबस्त वाढविला आहे.

मनीषा केसरेकर यांचा मृतदेह रविवारी (16 ऑगस्ट) त्यांच्या मूळ गावी हेब्बाळ, ता. खानापूर येथे आणण्यात येणार असून तेथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

या घटनेने हेब्बाळसह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गंभीर जखमी मोहन केसरेकर यांच्या प्रकृतीबाबत नातेवाईक आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *