Sunday , August 16 2026
Breaking News

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची रंगतदार मेजवानी अशा बहुरंगी वातावरणात सखी ग्रुपतर्फे ‘मंगळागौर २०२६’ उत्सव उत्साहात पार पडला. शास्त्रीनगर येथील गुजरात भवनमध्ये आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याला महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि लोककलेची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि जुन्या सांस्कृतिक परंपरांना आधुनिक पिढीशी जोडता यावे, या सुंदर उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मनीषा बेनके आणि वैष्णवी मुचंडीकर उपस्थित होत्या. विविध स्पर्धांचे परीक्षण रुपांजली भोसले आणि माया के यांनी केले.

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. यासोबतच लावणी नृत्य, फॅन्सी ड्रेस, चित्रकला, सांस्कृतिक स्पर्धा तसेच विविध मनोरंजक उपक्रमांनी संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले. महिलांनी पारंपरिक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर लहान मुलांनीही विविध उपक्रमांत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

परंपरेचा वारसा जपत नव्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देणारा आणि महिलांच्या सुप्त कलागुणांना नवे आकाश देणारा हा सोहळा ठरला. हास्य, उत्साह, कलाविष्कार आणि पारंपरिक संस्कृतीच्या सुंदर मिलाफामुळे ‘मंगळागौर २०२६’ उत्सव संस्मरणीय ठरला.

सखी ग्रुपच्या अध्यक्षा रश्मी चिकोर्डे आणि उपाध्यक्षा एकता गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी ग्रुपच्या सर्व सदस्या, सहभागी स्पर्धक आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

सरस्वती विद्या मंदिर किणये शाळेत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन संपन्न

Spread the love  बेळगाव : येथील ‘सरस्वती विद्या मंदिर, किणये शाळेत’ भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *