

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी होते. कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर आणि सहकार्यवाह शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बी. जी. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध स्फूर्तीदायी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. डॉ. शिंदे यांच्यासह शशिकांत शिंदे, कृष्णा इंदूलकर, विजयमाला पाटील आणि अश्विनी पाटील यांनी गीतांचे सादरीकरण केले.
विजय वाईगडे यांनी प्रार्थना सादर केली. वसंत पाटील, जगमोहन अगरवाल, रविंद्र कुंभोजकर, स्वाती माने आणि डॉ. मालतेश पाटील यांनी मराठी, हिंदी व कन्नड भाषेतील देशभक्तीपर गीते सादर केली. वनिता जोशी यांनी बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी एल. व्ही. सलगर, इराण्णा हलगी, विनायक वेलगी आणि सिद्धाप्पा देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. के. एल. मजूकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta