Sunday , August 16 2026
Breaking News

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खानापूर येथील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी (दि. ११) हा निकाल दिला. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने दोन्ही नेत्यांची मुक्तता केली.

या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक जी. आर. पाटील यांनी ही कारवाई केली होती.

भाषणानंतर तणाव निर्माण झाल्याचा आरोप

२६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांनी कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. त्यांच्या भाषणानंतर परिसरातील वातावरण चिघळले आणि खानापूर तसेच आसपासच्या भागात दगडफेकीच्या घटना घडल्याचा दावाही करण्यात आला होता.

कदम आणि बानुगडे-पाटील यांनी भगव्याबाबत आक्षेपार्ह अथवा प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात रामदास कदम यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता.

२० वर्षांनंतर खटल्याला पूर्णविराम

या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया तब्बल दोन दशके सुरू होती. अखेर मंगळवारी न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करत प्रकरणावर पडदा टाकला. सरकारी पक्षाने मांडलेले आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध होऊ न शकल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

About Belgaum Varta

Check Also

निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *