Sunday , August 16 2026
Breaking News

बेळगाव विभागात माध्यमिक शिक्षकांच्या ८३१ पदांची भरती

Spread the love

 

कन्नड, इंग्रजी, कला, जीवशास्त्र व शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी संधी; १८ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज

बेळगाव : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कर्नाटक शालेय शिक्षण विभागाच्या बेळगाव विभागीय कार्यक्षेत्रातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक शाळा सहशिक्षक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक ग्रेड-१ या पदांसाठी एकूण ८३१ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून १८ ऑगस्ट २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीमध्ये कन्नड विषयाचे १९२, इंग्रजीचे २०५, कला (कन्नड माध्यम) ९०, कला (इंग्रजी माध्यम) १३४, जीवशास्त्र (कन्नड माध्यम) ७५, जीवशास्त्र (इंग्रजी माध्यम) ९१ आणि शारीरिक शिक्षण शिक्षक ग्रेड-१ची ४४ पदे आहेत. अशा प्रकारे एकूण ८३१ पदे उपलब्ध आहेत.

भरतीसाठी पात्र उमेदवारांची विभागीय स्तरावर स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येणार असून, निवड प्रक्रियेत स्पर्धात्मक परीक्षेच्या गुणांना ८५ टक्के, पदवी परीक्षेतील गुणांना १३ टक्के आणि शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमातील (B.Ed.) गुणांना २ टक्के वजन देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अर्ज केवळ शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन भरायचा आहे. ऑफलाइन किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १८ ऑगस्ट ही सुरुवातीची, तर ७ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२६ आहे.

सामान्य व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका संवर्गातील एका पदासाठी अर्ज शुल्क ७५० रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-१, माजी सैनिक, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क आहे. एका संवर्गातील दोन पदांसाठी अनुक्रमे १,१२५ रुपये व ७५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्जाच्या अंतिम तारखेला उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. सामान्य प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे, प्रवर्ग-IIA, IIB, IIIA व IIIB साठी ४३ वर्षे, तर अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-१ व विशेष दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ वर्षे आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयानुसार निश्चित करण्यात आली असून उमेदवारांनी कर्नाटक सरकारच्या १० ऑगस्ट २०२६ रोजीच्या विशेष भरती नियमांनुसार पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किमान ३५ टक्के गुण मिळविणे बंधनकारक आहे.

उमेदवारांनी अर्ज भरताना संबंधित संवर्ग, विषय, माध्यम व जिल्ह्याची निवड काळजीपूर्वक करावी. अर्ज सादर केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत, अर्ज क्रमांक तसेच User Name व Password सुरक्षित ठेवण्याचे आवाहन अधिसूचनेत करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *