





बेळगाव : आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणाने एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी मच्छे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यात मयूर बाळू पोटे (वय ३०, रा. मच्छे, बेळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जखमी मयूर पोटे यांना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी स्वप्नील कलखांबकर (वय २१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयूर पोटे यांनी संशयिताच्या आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, हल्ल्यामागे अन्य कोणते कारण आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संशयिताच्या चौकशीतून हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta