

जांबोटी : विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अपयशानंतर खडतर परिश्रम करून त्याचे यशात रूपांतर करण्याची क्षमता ज्याच्यात असते, तोच जीवनात यशस्वी होतो, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

जांबोटी (ता. खानापूर) येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात बेळगाव रॉयल राऊंड टेबलच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कुस्ती मॅटचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
“जांबोटी माध्यमिक विद्यालयाचा सुंदर परिसर, कष्टाळू शिक्षकवर्ग आणि प्रचंड आत्मविश्वास असलेले विद्यार्थी पाहून आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने परिश्रम केले पाहिजेत. कष्ट करणाऱ्यांना आर्थिक परिस्थिती कधीच आड येत नाही. आज अनेक आयएएस अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता भविष्य घडविण्यासाठी समर्थ बनले पाहिजे,” असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग यांनी फीत कापून कुस्ती व्यायामशाळेचे उद्घाटन केले.
कार्यक्रमास बेळगाव रॉयल राऊंड टेबलचे चेअरमन वरुण पाटील, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी, बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे संचालक आनंद देसाई, कार्तिक मिस्कीन, रोहन सुंठणकर, आयुष्य दालमिया, क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष अशोक शिंत्रे, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णजी देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. वरुण पाटील आणि आनंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत विद्यालयाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कुस्ती राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये श्रावणी भरमाना पाटील (कुसमळी), भक्ती मनोहर गावडे (मोदी कोप), तनुजा रवींद्र गुरव (खानापूर) आणि त्रिवेणी विठ्ठल गावडे (आमगाव) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला गावातील युवा वर्ग, पंचमंडळी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहशिक्षक दिनकर पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta