

बेळगाव : नामांकित कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवून बेळगावातील एका महिलेची तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील ‘फॅब्रिको क्लिनिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावाने हा प्रकार घडला असून, याप्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पार्वतीनगर येथील श्वेता श्रीपती पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूपेंद्र प्रतापसिंग, अवधेश यादव यांच्यासह उत्तर प्रदेशातील अन्य ११ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महांतेश होस्पेटे यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे.
फिर्यादीनुसार, कंपनीच्या प्रतिनिधींनी श्वेता पिसे यांच्याशी संपर्क साधून क्लिनिंग सोल्युशन कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखविले. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळेल, असे सांगून त्यांना मोठी रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून श्वेता यांनी कंपनीत तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र, पैसे घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे फ्रेंचायजीचा व्यवसाय सुरू करून देण्यात आला नाही. तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे लाभांश किंवा गुंतवणुकीचा परतावा देण्यात आला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे श्वेता यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी उद्यमबाग पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, एवढी मोठी रक्कम नेमकी कोणत्या खात्यांमध्ये वळती करण्यात आली, आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का आणि या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta