

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, आपल्या आवडीनिवडी व क्षमतांचा विचार करून योग्य क्षेत्राची निवड करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नासा, अमेरिका येथे कार्यरत मराठी विद्यानिकेतनची माजी विद्यार्थीनी जया कुराडे या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आधुनिक काळातील विविध करिअरच्या संधी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, उच्च शिक्षणाच्या संधी तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरची निवड करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या पर्यायांपुरते मर्यादित न राहता आपल्या आवड, कौशल्य, जिज्ञासा आणि ध्येय यांचा विचार करून भविष्यातील वाटचाल निश्चित करावी, असे जया कुराडे यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करणे, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणे आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नासा, अमेरिका येथे कार्यरत असलेल्या जया कुराडे यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण व करिअरच्या संधींची ओळख झाली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, आपल्या भविष्यातील ध्येयाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास या व्याख्यानाची मोठी मदत झाली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना *योग्य करिअरची निवड म्हणजे आपल्या भविष्यातील यशाची पहिली पायरी हा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सविता पवार, नारायण उडकेकर, बी जी पाटील, नीला आपटे, इंद्रजीत मोरे उपस्थित होते.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये या करिअर मार्गदर्शन व्याख्यानाची भर पडली असून, विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमाला बी बी शिंदे, डी एस मुतगेकर, बी एम पाटील, प्रसाद सावंत, सुरेश कुंडेकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta