

बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला.
सन २००५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या गड्डेकर यांनी विविध ठिकाणी काम करताना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषतः सीसीबी आणि सीईएन विभागात कार्यरत असताना त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा माग काढण्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
इराणी टोळीचा पर्दाफाश, सायबर फसवणुकीत नागरिकांकडून लुटण्यात आलेली लाखो रुपयांची रक्कम परत मिळवून देणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत फसव्या कॉल सेंटरवर छापे टाकण्यासारख्या महत्त्वपूर्ण कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गड्डेकर यांच्या तपासकौशल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी यापूर्वीही विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित झाल्याबद्दल बेळगाव पोलीस दलातून गड्डेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा बहुमान पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta