

बेळगाव : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगळी आणि आयुक्त कार्तिक एम. यांच्या हस्ते गंगापूजा करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, जलाशय तुडुंब भरल्या नंतर गंगापूजन एक आनंदाचा क्षण आहे. शहरातील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही.मात्र जनतेनेही पाण्याचे महत्त्व समजून घेऊन त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
उपमहापौर हणमंत कोंगळी म्हणाले, राकासकोप जलाशयातून शहराला ४२ एमएलडी आणि हिडकल जलाशयातून ६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. जलाशय पूर्ण भरल्यामुळे मे महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या येणार नाही. महापालिकेत चर्चा करून जलाशयाच्या संवर्धन आणि विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. म्हणाले, जलाशय पूर्ण भरल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. पाणीटंचाईच्या काळात पाळले जाणारे पाणीपुरवठ्याचे नियम आता रद्द केले जातील. पूर्वीच्या नियमांनुसार पाणीपुरवठा केला जाईल.
याप्रसंगी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक गिरीश धोंगडी, जयतीर्थ सावदत्ती, माजी महापौर मंगेश पवार, श्रीशैल कांबळे, रेखा हुगार, दिपाली टोपगी, लक्ष्मी राठोड, सभागृह सचिव लक्ष्मी निप्पाणीकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta