Sunday , August 16 2026
Breaking News

श्रावण आला… बाजारपेठ फुलली!

Spread the love

 

सणांची मांदियाळी सुरू; स्वातंत्र्यदिनाच्या खरेदीला उधाण, तिरंगी साहित्याने बाजारपेठ सजली

बेळगाव : श्रावणाच्या आगमनाबरोबरच सण-समारंभांची चाहूल लागली आणि शहरातील बाजारपेठांनाही उत्साहाचे भरते आले. नागपंचमी, स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि ईद-ए-मिलाद असे सलग सण येत असल्याने बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तर खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. दुकानांच्या दुतर्फा लागलेल्या रांगा, विक्रेत्यांची लगबग आणि वाहतुकीची कोंडी यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप आले होते.

तिरंगी रंगांनी सजली बाजारपेठ!

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बाजारपेठेतही पाहायला मिळत आहे. शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने केशरी-पांढऱ्या-हिरव्या रंगांचे टी-शर्ट, तिरंगी बॅच, झेंडे आणि अन्य देशभक्तीपर साहित्याला मोठी मागणी आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विक्रेत्यांनीही विविध प्रकारचे साहित्य दुकानांमध्ये आकर्षक पद्धतीने मांडले आहे.

नागपंचमीच्या खरेदीनेही रंग भरला

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पूजेसाठी लागणारे साहित्य आणि विविध खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. ठिकठिकाणी चिवडा, लाडू, शेंगदाणे, पोहे, लाह्या, चिरमुरे आदींचे स्टॉल सजले आहेत. विशेषतः भट्टी परिसरात खरेदीसाठी महिलांची मोठी वर्दळ दिसून येत आहे.

श्रावणातील पहिल्या सोमवारमुळे उपवासासाठी लागणारे पदार्थ, फळे आणि पूजासाहित्य खरेदी करण्यासाठीही ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

फळे-फुलांचा बाजारही बहरला

श्रावणातील धार्मिक विधी आणि व्रत-वैकल्यांमुळे फुले व फळांना मागणी वाढली आहे. फुलांच्या बाजारात विविध रंगांची फुले आणि फळबाजारात विविध प्रकारची फळे खरेदीसाठी उपलब्ध असून, सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

महिलांची वस्त्रदालनांकडे धाव

श्रावणातील सण आणि समारंभांसाठी महिलांनीही खरेदीची लगबग सुरू केली आहे. शहरातील वस्त्रदालनांमध्ये साड्या, पारंपरिक पोशाख, ड्रेस मटेरियल आणि विविध कपड्यांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे वस्त्रदालनांमध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

बाजारपेठेला सणांचे ‘ग्लॅमर’

श्रावण म्हणजे व्रत-वैकल्यांसोबतच सण-समारंभांची मांदियाळी. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या रंग, उत्साह, खरेदी आणि गर्दीचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. एका बाजूला तिरंगी झेंड्यांनी आणि साहित्याने सजलेली दुकाने, दुसरीकडे नागपंचमीच्या पूजासाहित्याचे स्टॉल, तर वस्त्रदालनांमध्ये सुरू असलेली महिलांची खरेदीची लगबग… या सर्वामुळे शहराची बाजारपेठ अक्षरशः ‘श्रावणमय’ झाली आहे.

आगामी काळात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि ईद-ए-मिलाद यांसारखे सण असल्याने बाजारपेठेतील ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून, व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *