Monday , September 7 2026
Breaking News

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार

Spread the love

 

दोन-तीन महिन्यांत निर्जंतुकीकरण, लसीकरण व स्थलांतर; प्रत्येक प्रभागात ‘फीडिंग पॉइंट’चीही व्यवस्था

बेळगाव : शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता ठोस पावले उचलली आहेत. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता निर्जंतुकीकरण, लसीकरण, निवारा आणि अन्नाची व्यवस्था असा सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दोन ते तीन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली असून, आगामी दोन-तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने कुत्र्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता हा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे.

निवारा केंद्रांसाठी निविदा प्रक्रिया

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृती आराखड्यांतर्गत भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या असून, आगामी दोन महिन्यांत केंद्रांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, शाळा-महाविद्यालयांच्या आवारात तसेच सरकारी कार्यालयांच्या परिसरात वावरणाऱ्या कुत्र्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार आहे.

विशेषतः आक्रमक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या कुत्र्यांवर प्रथम कारवाई केली जाणार आहे. स्थलांतरापूर्वी कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘दत्तक’ घेण्याची सुविधाही

एबीसी केंद्रांमध्ये केवळ कुत्र्यांचे स्थलांतर न करता त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेतली जाणार आहे. पशुवैद्यकीय सेवा, औषधे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इच्छुक नागरिकांना कुत्री दत्तक घेता यावीत, यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

प्रत्येक प्रभागात ‘फीडिंग पॉइंट’

भटक्या कुत्र्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांच्यात आक्रमकता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात कुत्र्यांना अन्न देण्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून येत्या १५ दिवसांत या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी सार्वजनिक रस्ते, शाळा किंवा गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांना अन्न न देता प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच अन्न देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार स्थलांतर

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एकाच उपायाने सुटणार नसल्याने निर्जंतुकीकरण, लसीकरण, निवारा, अन्न आणि दत्तक व्यवस्था या सर्व बाबींची सांगड घालून उपाययोजना करण्यात येणार आहे. आगामी दोन-तीन महिन्यांत एबीसी केंद्रांची कामे पूर्ण करून त्यानंतर कुत्र्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाणार आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे संरक्षण या दोन्ही बाबींचा समतोल साधून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *