
बेळगाव : मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही स्वतःला त्या मालमत्तेचा मालक असल्याचे भासवून जमीन विक्रीचा करार केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी ७५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रामचंद्र व्यंकटेश देशपांडे (वय ७५, रा. पाटील गल्ली, कोटबागी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीशैल दत्तात्रय गुरव (वय २९) यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४/२०२५ दाखल करण्यात आला होता.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे आजोबा माशणू जायप्पा गुरव आणि त्यांच्या भावंडांनी सन १९९८ मध्ये चिदंबर श्रीपाद कुलकर्णी व रमेश दिगंबर कुलकर्णी यांच्याकडून बडाल अंकलगी गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक ३४० मधील ७ एकर ३२ गुंठे जमीन खरेदी केली होती. संबंधित जमीन त्यांच्या ताब्यात व वहिवाटीत होती.
मात्र, या जमिनीचे मूळ मालक चिदंबर श्रीपाद कुलकर्णी यांचे निधन झालेले असतानाही आरोपी रामचंद्र देशपांडे याने आपणच या मालमत्तेचा मालक असल्याचे भासविले. त्यानंतर बेळगाव उपनिबंधक कार्यालयात जाऊन वेब कॅमेऱ्यात फोटो काढून व अंगठ्याचा ठसा देत संबंधित जमिनीबाबत इतर आरोपींच्या नावे ‘अॅग्रीमेंट ऑफ सेल’ केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माध्यमातून तक्रारदाराची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपीची चौकशी करून त्याला ११ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी विनोद देशपांडे याच्यासह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मार्केट पोलिस ठाण्याचे पीआय जे. एम. कालिमिर्ची, पीएसआय एच. एल. केरूर व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. त्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta