

Instagramवरील एका लिंकपासून सुरुवात; 1 हजारांचे 4,800 दाखवून विश्वास संपादन, पुढे 23.59 लाखांचा चुना
बेळगाव : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून झटपट पैसा कमावण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या 20 वर्षीय तरुणाला सायबर ठगांनी तब्बल 23 लाख 59 हजार 750 रुपयांचा गंडा घातला. Instagramवरील एका जाहिरातीच्या लिंकपासून सुरू झालेला हा प्रकार तब्बल साडेतीन महिने सुरू राहिला. अखेर ना नफा मिळाला, ना जमा केलेली रक्कम परत आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने शहर सायबर क्राईम पोलिसांत धाव घेतली.
आश्रय कॉलनी येथील इलियास (वय 20) यांनी गुरुवारी, 13 ऑगस्ट रोजी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Instagramची लिंक अन् फसवणुकीचा ‘गेम’ सुरू
15 फेब्रुवारी रोजी इलियास यांच्या Instagramवर ऑनलाइन गेमिंगची जाहिरात आली. जाहिरातीवर क्लिक करताच त्यांना ‘एव्हिएटर’ गेमिंग वेबसाइटची लिंक मिळाली. वेबसाइटवर खाते उघडण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला केवळ 1 हजार रुपये जमा करून त्यांनी गेम खेळण्यास सुरुवात केली.
याच ठिकाणी सायबर ठगांनी आपला डाव साधला. पहिल्याच टप्प्यात तरुणाला विजयी झाल्याचे सांगून त्याच्या खात्यात 1 हजार रुपयांच्या बदल्यात 4,800 रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे वेबसाइटवर विश्वास बसला आणि मोठी रक्कम गुंतवण्याचा मार्ग मोकळा झाला.
छोट्या रकमेपासून थेट लाखोंपर्यंत!
‘आणखी खेळायचे असेल तर डिपॉझिट करा’, असे सांगत त्याच्याकडून वारंवार पैसे जमा करून घेण्यात आले. सुरुवातीला छोट्या रकमेपासून सुरू झालेला हा व्यवहार हळूहळू लाखोंमध्ये पोहोचला. 15 फेब्रुवारी ते 5 जूनदरम्यान इलियास यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल 23 लाख 59 हजार 750 रुपये जमा केले.
मात्र, एवढी मोठी रक्कम जमा करूनही प्रत्यक्षात कोणताही नफा मिळाला नाही. पैसे परत मिळविण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. वेबसाइटकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
फसवणुकीनंतर इलियास यांनी शहर सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, बँक व्यवहार, ऑनलाइन खात्यांची माहिती आणि गेमिंग वेबसाइटशी संबंधित डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी सावध राहण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे. छोट्या रकमेवर विश्वास संपादन करून नंतर लाखोंची गुंतवणूक करवून घेण्याची सायबर ठगांची ही नवी पद्धत ठरत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta