Sunday , August 16 2026
Breaking News

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love

 

 

बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती देणारा पवित्र श्रावणमास सुरू झाला असून, उद्या पहिल्या श्रावण सोमवारी शिवभक्तीचा मंगल सोहळा रंगणार आहे. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने बेळगावची दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर नगरी दुमदुमणार असून, पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या चरणी भक्तीचा सागर लोटणार आहे.

श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी श्रद्धेचा, उपासनेचा आणि आत्मिक समाधानाचा पर्वणीचा दिवस. या पावन पर्वाच्या स्वागतासाठी श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर सज्ज झाले असून, मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची मनोहारी सजावट आणि धार्मिक देखाव्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.

मध्यरात्रीपासून महादेवाच्या चरणी अभिषेकधारा

श्रावण महोत्सवाची सुरुवात रात्री १२.३० वाजता पहिल्या अभिषेकाने होणार आहे. समस्त बेळगावकरांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि जनकल्याणासाठी दरवर्षी हा अभिषेक करण्यात येतो. पहाटे ४ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेकाची अखंड धारा शिवलिंगावर वाहणार आहे.

त्यानंतर विशेष रुद्राभिषेक आणि त्रिकाल पूजा करण्यात येणार असून, वैदिक मंत्रोच्चार, घंटानाद आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या गजरात कपिलेश्वराच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला जाणार आहे.

सायंकाळी निघणार भव्य पालखी प्रदक्षिणा

दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी ७.३० वाजता भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. फुलांनी सजलेली पालखी, भक्तांचा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या घोषात होणारी ही प्रदक्षिणा भाविकांसाठी आध्यात्मिक अनुभूती ठरणार आहे.

यानंतर विशेष महाआरतीने पहिल्या श्रावण सोमवारच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल.

सप्तर्षींची महती सांगणारा भव्य राजमहाल

दरवर्षी धार्मिक आणि सांस्कृतिक देखाव्याच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्माची अनुभूती देणाऱ्या कपिलेश्वर मंदिराने यंदाही ही परंपरा कायम ठेवली आहे. यंदा राजमहालाच्या माध्यमातून हिंदू वैदिक परंपरेतील पवित्र सप्तर्षींची महती भाविकांसमोर साकारण्यात येणार आहे.

ऋषीपरंपरेचा वारसा, वैदिक संस्कृतीचे वैभव आणि सप्तर्षींचे अध्यात्मातील स्थान याची माहिती या देखाव्यातून भाविकांना करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा देखावा केवळ डोळ्यांना सुखावणारा नसून, नव्या पिढीला आपल्या प्राचीन वैदिक परंपरेशी जोडणारा ठरणार आहे.

फुलांच्या सुगंधात आणि रोषणाईत उजळले कपिलेश्वरधाम

श्रावणाच्या स्वागतासाठी मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. विनायक पालकर व त्यांच्या टीमसह राजू लोहार आणि बसवराज हुंदेकर यांच्या सहकार्याने ही मनोहारी सजावट साकारण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही टीम कपिलेश्वर मंदिरातील धार्मिक देखावे आणि सजावटीची परंपरा भक्तिभावाने जपत आहे.

श्रावण म्हणजे केवळ एक महिना नव्हे, तर मनातील अहंकार बाजूला ठेवून महादेवाच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा काळ. बेलपत्र, जलाभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप आणि ‘ॐ नमः शिवाय’चा अखंड नाद यामधून शिवभक्तांना आत्मिक समाधानाची अनुभूती मिळते.

अशा या पवित्र श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दक्षिण काशी कपिलेश्वराच्या चरणी भक्तीचा जागर होणार असून, संपूर्ण कपिलेश्वर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे.

पवित्र श्रावणमास आणि नागपंचमीनिमित्त श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने समस्त बेळगावकर नागरिकांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!

हर हर महादेव! ॐ नमः शिवाय!

About Belgaum Varta

Check Also

मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love  मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *