
महाराष्ट्र एकीकरण समितीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : कुपवाड (जि. सांगली) येथे १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या हिंसक घटनेत मृत्यू झालेल्या हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
याबाबत समितीच्या वतीने गुरुवारी (२० ऑगस्ट) खानापूर तहसीलदारांमार्फत बेळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी निवेदन स्वीकारले.
केसरेकर दाम्पत्याचे मूळ गाव हेब्बाळ असल्याने या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर अंत्यविधी, वैद्यकीय उपचार, कायदेशीर प्रक्रिया, प्रवास आणि उदरनिर्वाहाचा अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे शासनाच्या लागू नियमांनुसार कुटुंबीयांना तातडीचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे, तसेच लागू Victim Compensation Scheme अंतर्गत कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याशिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या माध्यमातून कुटुंबीयांना मोफत कायदेशीर सल्ला व प्रतिनिधित्व उपलब्ध करून द्यावे. FIR, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमॉर्टेम अहवाल, पंचनामा तसेच नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणीही समितीने केली.
मृतांच्या कायदेशीर वारसांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य, निवारा, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत. तसेच सांगली व बेळगाव जिल्हा प्रशासन आणि खानापूर तहसील कार्यालयाने समन्वय साधून महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या उपलब्ध मदतीचा लाभ कुटुंबीयांना मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यात आली.
दोन जिवलग व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर अचानक आलेल्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणाकडे मानवीय आणि सहानुभूतीपूर्वक दृष्टीने पाहावे. आर्थिक मदत, नुकसानभरपाई, कायदेशीर सहाय्य आणि इतर शासकीय लाभ शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समितीने केली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, पुंडलिक पाटील, संजीव पाटील, पाटील गुरुजी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta