Thursday , August 20 2026
Breaking News

टूल होल्डर्स कंपनीतर्फे कामगारांच्या गुणवंत मुलांमुलींना शैक्षणिक मदत

Spread the love

 

बेळगाव : टूल होल्डर्स कंपनीचे मालक कै. दिलीप पांडुरंग भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त १७ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीमध्ये श्रद्धांजलीपर विद्यार्थी मदतनिधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कै. भागवत साहेब हे शिक्षणप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच कामगारांच्या हिताचा सातत्याने विचार करणारे व्यक्तिमत्त्व होते. कामगारांनी व्यसनांपासून दूर राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि शिस्तबद्ध जीवन जगावे, यासाठी ते नेहमी आग्रही असत. कंपनीच्या परिसरात गुटखा, तंबाखू यांसारख्या व्यसनांना त्यांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही. कामगारांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याचीही त्यांना कायम काळजी होती.
याच विचारांचा वारसा पुढे नेत कंपनी व्यवस्थापनातर्फे १० वी नंतर ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उच्च शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांमुलींना शैक्षणिक मदतनिधी देण्यात आली. कामगारांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा आणि त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

हा कार्यक्रम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रवीण बेळगावकर, डायरेक्टर राम जोगन्नावर आणि सचिन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण बेळगावकर, व डायरेक्टर राम जोगन्नावर यांनी कै. दिलीप पांडुरंग भागवत यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, भागवत साहेबांनी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिले. कामगार सक्षम झाला पाहिजे, त्याचे कुटुंब पुढे गेले पाहिजे आणि पुढील पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती केली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्याच विचारातून शैक्षणिक मदत निधीचा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे.

पर्यावरण संवर्धन, कामगारांचे आरोग्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रातही भागवत साहेबांनी दिलेले योगदान उल्लेखनीय होते. त्यांच्या विचारांची जपणूक करत कंपनीच्या माध्यमातून भविष्यातही कर्मचारी हिताचे, शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कै. दिलीप पांडुरंग भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

हिंडलगा कारागृहात वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे; तरुणाकडून पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *