

बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत एका माजी कैद्याने व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केले आहेत. तुमकूर येथील साईकुमार नावाच्या तरुणाने २०२४ मध्ये हिंडलगा कारागृहात कैदी असताना तेथील परिस्थितीचा अनुभव घेतल्याचा दावा केला आहे.
साईकुमारने केलेल्या आरोपांनुसार, कारागृहात मोबाईल फोन, गांजा तसेच इतर प्रतिबंधित वस्तू कथितरीत्या बेकायदेशीर मार्गाने आत आणल्या जात असून त्यांची पैशांसाठी विक्री केली जाते. या गैरप्रकारांविरोधात आवाज उठविल्यास किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात असल्याचाही आरोप त्याने केला आहे.
कारागृहात अनैतिक संबंध आणि वेश्याव्यवसायासारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा दावा साईकुमारने व्हिडिओमध्ये केला आहे. तसेच काही अधिकारीच प्रतिबंधित वस्तू आणि अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
दरम्यान, हिंडलगा कारागृहात काही काळ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याबाबतही व्हिडिओमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित महिला अधिकारी कैद्यांशी अनुचित संबंध ठेवत असल्याचे तसेच प्रतिबंधित वस्तू कारागृहात पोहोचविण्यात तिचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी किंवा प्रकरण नोंदविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मात्र, या सर्व आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची कारागृह प्रशासन तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta