
बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मराठा समाजातील कष्टकरी दाम्पत्याची निर्घृण हत्या करून त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांना अनाथ करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी असलेल्या केसरेकर कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे बेळगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर, तसेच फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला योग्य न्याय व मदत मिळावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
मराठा समाजाचे समन्वयक गुणवंत पाटील, रमाकांत दादा कोंडुस्कर, मराठी समाजप्रमुख सागर पाटील, महादेव पाटील, कपिल भोसले, श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यासह विविध संघटना आणि बेळगावकरांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता सरदार हायस्कूल मैदानातून मोर्चाला सुरुवात होईल. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह अनाथ झालेल्या दोन बालकांना न्याय व आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी निवेदनातून केली जाणार आहे.
या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी मराठा समाजासह सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta