Thursday , August 20 2026
Breaking News

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा; तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक डागडुजी करावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली. तालुक्यातील अनेक गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, उत्सवाच्या काळात नागरिक व गणेशभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ज्या सवलती व सुविधा दिल्या जातात, त्याच सुविधा ग्रामीण भागातील मंडळांनाही मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या युवक मंडळांना तात्पुरती वीज जोडणी मोफत देऊन सुरक्षा ठेव आकारू नये, अशी मागणीही समितीने केली.

पावसाळा संपल्यानंतर दसरा आणि दिवाळीच्या सुमारास गावांमधील खराब रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात यावे. ही कामे रखडल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.

दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवून आवश्यक डागडुजी पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. ज्या गावांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, अशा गावांची यादी प्रशासनाकडे सादर करण्याची सूचना त्यांनी समितीला केली. त्यानुसार संबंधित विभागांच्या समन्वयाने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या धोरणाचाही आढावा घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावेळी बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांच्यासह शिष्टमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रेशनधारकांना दिलासा! ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती

Spread the love  सर्व्हरवरील ताणामुळे निर्णय; १ सप्टेंबरपासून प्रक्रिया पुन्हा सुरू बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *