
सर्व्हरवरील ताणामुळे निर्णय; १ सप्टेंबरपासून प्रक्रिया पुन्हा सुरू
बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या सदस्यांची दर पाच वर्षांनी करण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कोट्यातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित केले जात असल्याने लाभार्थ्यांना दोन वेळा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागत आहे. त्यामुळे सर्व्हरवर मोठा ताण येऊन तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने बुधवार, दि. १९ ऑगस्टपासून ई-केवायसी प्रक्रिया थांबविली आहे.
मयत तसेच बोगस लाभार्थ्यांची नावे वगळणे आणि रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी दर पाच वर्षांनी ई-केवायसी केली जाते. बेळगाव जिल्ह्यात रेशन कार्डवरील २२ लाखांहून अधिक सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक असून, आतापर्यंत ११ लाखांपेक्षा अधिक सदस्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दरम्यान, अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारच्या कोट्यातून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे रेशन एकाच महिन्यात दिले जात आहे. यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक असल्याने ई-केवायसीसाठी स्वतंत्र बायोमेट्रिक प्रक्रिया केल्यास सर्व्हरवरील भार आणखी वाढत आहे. परिणामी अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे, प्रमाणीकरणात अडथळे येणे अशा समस्या निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर विभागाने ई-केवायसीला काही दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनधारकांनी सध्या ई-केवायसीसाठी गर्दी न करता १ सप्टेंबरनंतर संबंधित रास्त भाव दुकानात जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे रेशनधारकांना काहीसा दिलासा मिळाला असून, उर्वरित लाभार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Belgaum Varta Belgaum Varta