Thursday , August 20 2026
Breaking News

युवक हे समाजपरिवर्तनाचे सक्रिय शिल्पकार : ऑनररी कॅप्टन लक्ष्मण पाटील

Spread the love

 

कुर्ली येथे युवासंमेलन कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : युवक हे देशाचे भविष्य आणि समाजाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. युवकांमध्ये ऊर्जा, उत्साह, कल्पकता, नेतृत्वगुण आणि नवनवीन विचार करण्याची क्षमता असते.सक्षम युवक, सक्षम समाज, सक्षम राष्ट्र या विचाराने युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. त्यामुळे युवक हे केवळ उद्याचे नागरिक नसून आजच्या समाजपरिवर्तनाचे सक्रिय शिल्पकार आहेत असे मत आठ मराठा युनिटचे ऑनररी कॅप्टन लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील एच जे सी चीफ फौंडेशन व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा जोतिराम चौगुले यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित युवासंमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी कॅप्टन विलास पाटील हे होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत व केले. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरजवानांना श्रद्धांजली वहाण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन युवासंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. शिवाजी चौगुले यांनी फौंडेशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सुभेदार पदावर पदोन्नती झाल्याबद्दल रामदास उर्फ युवराज पाटील यांचा व सैनिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भाटनांगनूर येथील नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रामदास पाटील यांनी फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करुन पंचवीस हजारची देणगी दिली. दुसऱ्या सत्रात मराठी भावगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. निपाणी येथील जेष्ठ लेखक व गायक सुनील किरळे यांनी अरुण दाते, ग. दि. माडगूळकर लिखित भावगीते सादर केली. याप्रसंगी त्यांनी गायिलेल्या शौर्य गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. युवा वकील सूर्याजी पोटले यांनी डिजिटल मेडिया व युवकांची मानसिकता, अजित पाटील यांनी व्यवसाय कौशल्य नियोजन, साक्षी पाटील यांनी सामाजिक विकासात युवकांची जबाबदारी, सुभेदार मारुती पाटील यांनी लष्करातील संधी, मुख्याध्यापिका ए एम अमृतसम्मन्नावर यांनी आहार व आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. यानिमित्त विविध स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत खेळाडूंना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. सीताराम चौगुले, संदीप पिष्टे, सुभाष चौगुले, शैलेश बोंगार्डे, श्रेयस शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
याप्रसंगी सुभेदार सुधाकर पाटील, सुभेदार विजय पाटील, नायब सुभेदार बाळीशा मगदूम, सुभेदार मधुकर पाटील, सुभेदार शंकर दिवटे, सुभेदार नामदेव पाटील, सुभेदार राजाराम मगदूम, डी एस चौगुले, विश्वनाथ पाटील, राजाराम गुरव, सज्जन पाटील,संतोष निढोरे, अप्पासाहेब पाटील यांच्यासह कुर्ली, भाटनांगनूर, सौन्दलगा, कौलगे, म्हाकवे, सिद्धनेर्ली येथील आजी माजी सैनिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आराध्या चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर शरयू चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अत्याधुनिक नंबर प्लेट, हेल्मेट सक्तीबाबत निपाणी पोलिसांची धडक कारवाई; दिवसभरात ३९ जणावर कारवाईचा बडगा

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्रावण सोमवारची संधी साधून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *