

निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती करण्यासह जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून बोरगाव परिसरातील पिण्याच्या आणि शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी बैठकीत केली.
उन्हाळ्यात दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
तात्यासाहेब बसन्नावर म्हणाले, बोरगावच्या सुमारे ७,९२९ एकर क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्र बागायत असून बंधारा झाल्यास परिसरातील गावांना सिंचनासाठी फायदा होईल. उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्याने शेती पिकांना फटका बसत आहे. या ठिकाणी बंधारा झाल्यास शेतकऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. जुना बंधारा असून दुरुस्ती न झाल्याने पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून देण्याची मागणी केली.
सुनील पाटील यांनी, दूधगंगा नदी परिसरात कृषी क्षेत्र अधिक आहे. पण बंधारा नसल्याने शेती पिकाबरोबरच उन्हाळ्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणीही व्यवस्थित मिळत नाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्पुरता जुना बंधारा दुरुस्त करण्याची मागणी केली. याशिवाय ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, अशी मागणीही केली. नगरसेवक प्रदीप माळी, शितल सोबाने अभिनंदन फिरगणावर भाऊसाहेब फिरगन्नावर जितेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीस सुकुमार चिपरे, रमेश मालगावे, जितेंद्र पाटील, नैनेश पाटील, राजगोंडा पाटील, अभिनंदन फिरगन्नावर, शितल सोबाणे, संदीप चित्रे, आदिनाथ जंगटे, अभय पाटील, भरत हवले, संदीप बसन्नावर, अमित बसन्नावर, अमित माळी, भाऊसाहेब फिरगन्नावर, बाहुबली हवले, काकासाहेब नाडगे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta