

मृत्यू नोंदणीतील अडथळे, शिवाजी रोडवरील विद्युत तारा दुरुस्ती, येळ्ळूर रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येबाबत चर्चा
येळ्ळूर : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध समस्या सोडविण्यासाठी समाज सारथी संघ सक्रिय झाला आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, शिवाजी रोडवरील खाली आलेल्या विद्युत तारांमुळे निर्माण झालेला धोका तसेच येळ्ळूर रस्त्यावर केएलई रुग्णालयालगत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, या प्रश्नांवर संघाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. सी. एम. गोरल होते.
येळ्ळूर रस्त्यावर केएलई रुग्णालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्याचे बैठकीत ठरले. तसेच शिवाजी रोडवरील विद्युत तारा खाली आल्याने त्यांची उंची वाढविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रारंभी निवृत्त शिक्षक अनिल हुंदरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघाला नोंदणीकृत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाजी सायनेकर यांनी संघाचे पुढील कामकाज कोणत्या पद्धतीने करायचे, याबाबत चर्चा करून नियोजन करण्याची सूचना केली.डॉ. तानाजी पावले यांनी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. या समस्येवर तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश अष्टेकर यांनी संघाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्याबाबत मौलिक सूचना केल्या.
संघाचे सचिव बी. एन. मजुकर यांनी संघाला नोंदणीकृत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली. अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यापुढे नोंदणीकृत संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.दुद्दाप्पा बागेवाडी यांनी संघाचे काम पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने आणि स्वतंत्रपणे करण्याचे आवाहन केले. संघटनेत कोणतेही राजकारण न करता केवळ समाजहिताची कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला निवृत्त शिक्षक गोविंद मासेकर, रमेश धामणेकर, सूरज गोरल, रमेश मोनाप्पा धामणेकर, प्रकाश पाटील, संजय गोरल, संजय मजुकर, अभियंते हणमंत कुगजी, यल्लुप्पा पाटील, राजू पावले, हणमंत पाटील, गंगाधर पाटील आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta