

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकवून ठेवाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत तुरमुरी, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, बेक्किनकेरे, उचगाव, कल्लेहोळ, आतवाड, मन्नुर, गोजगा, हिंडलगा, सूळगा, गणेशपूर, विजयनगर, तसेच बेनकनहळी आदि शाळांमध्ये हे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

तुरमुरी प्राथमिक शाळेत वितरण करताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आशिष कोचेरी यांनी सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, हे आज सिद्ध झालेले आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. युवा समितीच्या वतीने मागील नऊ वर्षे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करण्यासाठी म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते.
बाची येथील शाळेमध्ये युवा समितीचे पदाधिकारी निखिल देसाई यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते मुलांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन्सिल किट, असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
उपक्रमाला समितीचे कार्यकर्ते महेंद्र जाधव, प्रताप राजुकर, निरंजन अष्टेकर, श्रीशैल मासेकर, नागेंद्र तंगणकर, महेश चौगुले, नागेश बेळगावकर, हेमंत कंग्राळकर मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका शिक्षकवर्ग शाळा सुधारणा समितीचे सदस्य, गावकरी आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta