Tuesday , August 18 2026
Breaking News

‘बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग’ ठरावावरून महापालिका सभेत गोंधळ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करणारा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच मंजूर करावा, अशी मागणी काँग्रेस आणि सरकारच्या नामनिर्देशित सदस्यांनी मंगळवारी लावून धरली. या मुद्द्यावरून महापालिका सभेत काही काळ जोरदार गदारोळ झाला.

सभा सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी कर्नाटकाच्या बाजूने ठराव स्वीकारण्याची मागणी केली. सरकारच्या सूचनेची वाट पाहण्याची गरज नाही. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याबाबत महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह त्यांनी धरला.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी ठराव स्वीकारण्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे सभागृहात समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. या मुद्द्यावर भाजपचे सदस्य मौन बाळगत असल्याबद्दल काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठरावासंदर्भात यापूर्वीच सरकारला पत्र पाठविण्यात आले असून, सरकारच्या सूचनेनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सभागृहात स्पष्ट केले.

यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेत, “सरकारच्या सूचनेची वाट पाहू नका. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो; मात्र बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव आजच मंजूर करावा,” अशी मागणी केली.

सदस्यांमधील शाब्दिक चकमक आणि गोंधळ वाढत गेल्याने महापौर प्रीती कामकर यांनी सभा तहकूब केली आणि त्यानंतर सभागृहातून बाहेर पडल्या.

About Belgaum Varta

Check Also

मन्नूर येथील मातोश्री सोसायटीतर्फे नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीचा सत्कार

Spread the love  बेळगाव : मन्नूर येथील मातोश्री सोहार्द सहकारी संघ (सोसायटी) यांच्या वतीने नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *