

बेळगाव : राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या महिला कोट्यातील एका मंत्रीपदावरून पुन्हा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि उमाश्री यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्या बाजूने भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
मंत्रिमंडळ पुनर्रचनेदरम्यान महिलांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने रिक्त असलेल्या एका जागेवर कोणाला संधी मिळणार, याबाबत काँग्रेसमध्ये विविध तर्कवितर्क सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ आवाज उठवल्याने बेळगावच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा विचार करता, लक्ष्मण सवदी हे देखील मंत्रिपदावर असल्याने जिल्ह्यातील राजकीय प्रभावाची समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. जारकीहोळी आणि सवदी कुटुंबांमध्ये पूर्वीपासून राजकीय मतभेद राहिले असतानाही सतीश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने या भूमिकेमागील राजकीय गणिताबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, महिला कोट्यातील रिक्त मंत्रीपदासाठी अखेर कोणाची निवड होणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा आगामी काळात बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta