





‘टीम कर्नाटक’च्या भावनेने जनसेवा करा
बंगळूर : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘टीम कर्नाटक’च्या भावनेने एकत्रितपणे काम करून जनतेची सेवा करावी. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला.
विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ संवाद साधताना ते बोलत होते. राज्यातील सुमारे साडेपाच लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सात कोटी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जनसेवा हाच प्रत्येकाचा मूलभूत उद्देश असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, प्रत्येकाने आपल्या केंद्रस्थानी राहून जनतेच्या समस्या सोडवाव्यात. नागरिक अडचणी घेऊन कार्यालयात आल्यानंतर त्यांना कारणे सांगून परत पाठवू नका. सर्व कामे कायद्याच्या चौकटीतच करा, असे निर्देश त्यांनी दिले.
सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत विलंब न करता पोहोचवावा. स्थानिक पातळीवरील समस्या तेथेच सोडवाव्यात; त्या विनाकारण वरिष्ठांकडे पाठवू नयेत, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारने गरीब आणि गरजू जनतेच्या मदतीसाठी हमी योजना सुरू केल्या असून, त्यातून सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे. मात्र, काही ठिकाणी योजनांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत व्यक्तींच्या नावावरही योजनांचा लाभ घेतला जात असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने गैरवापर रोखण्याची कार्यवाही सुरू आहे. शक्ती योजनेअंतर्गत ओळखपत्र देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात. बनावट बिले तयार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट बिलांना आळा घालण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी शाळा, वसतिगृहे, रास्त भाव दुकाने आणि तालुका कार्यालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी काम करावे. दुष्काळ निवारणाच्या कामांकडेही विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तक्रार पेटीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
‘सत्ता ही अधिकार गाजवण्याचे साधन नसून जबाबदारी आहे. सत्ता म्हणजे सिंहासन नव्हे, तर जनसेवेची मिळालेली संधी आहे,’ असे शिवकुमार यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सामाजिक न्याय व समानतेची भावना ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील प्रगतीमध्ये आतापर्यंत काम केलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. कर्नाटककडे उत्तम मनुष्यबळ असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्याने देशातच नव्हे, तर जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ‘प्रजासेवा विभाग’ सुरू करण्यात आला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी महिन्यातून दोनदा तालुक्यांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यांना भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गाव आणि विभाग पातळीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही निर्देश दिले.
या व्हिडिओ संवादात मंत्री लक्ष्मण सवदी, संतोष लाड, विजय आनंद काशप्पूर, अजय सिंह, मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कुणिगल येथून संवादात सहभाग घेतला.
नूतन मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी, ‘नूतन मंत्र्यांना आजच खातेवाटप करणार आहे,’ असे स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta