
बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांनी विधान परिषदेच्या सभापती पदी शुक्रवारी विधान परिषदेचे माजी सभापती बसवराज होरट्टी यांच्या दालनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. तसेच केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, मंत्री नरेंद्रस्वामी, विधान परिषदेचे सरकारी मुख्य सचेतक सलीम अहमद, आमदार प्रकाश कोळीवाड तसेच विधान परिषदेचे सदस्य एस. रवी, आयव्हन डी’सूझा, एच. पी. सुधामदास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांचा राजीनामा
दरम्यान, कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
कार्यकाळ संपण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुरुवातीला होरट्टी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस आणण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर होरट्टी यांनी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र, शुक्रवारी डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तत्काळ सभापतीपदाचा राजीनामा सादर केला. आपल्या राजीनामा पत्रात हा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, नव्या सभापतीची निवड होईपर्यंत बसवराज होरट्टी हंगामी सभापती म्हणून कामकाज पाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta