
बेळगाव : मराठा युवक संघ, आबा व हिंद स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २१ व्या भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन शनिवार, २९ ऑगस्ट आणि रविवार, ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडणार असून, याबाबतचा निर्णय मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी अक्षता मंगल कार्यालय येथे झालेल्या मराठा युवक संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी मराठा युवक संघाचे सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी स्पर्धेच्या तारखा जाहीर करत या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि क्रीडाप्रेमींनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, नारायण किटवाडकर, शेखर हांडे, सुहास किल्लेकर, शिवाजीराव हंगरगेकर, नेताजी जाधव, श्रीकांत देसाई, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शीतल हुलभते यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेची माहिती देताना जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी सांगितले की, स्पर्धा कॉलेज गटासह ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आली आहे. विविध वयोगटांतील जलतरणपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा व महाविद्यालयांतील जलतरणपटूंनी आपली नावे २७ ऑगस्टपूर्वी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी विश्वास पवार, अमित जाधव आणि रणजीत पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठा युवक संघाचे सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta