
बेळगाव : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. याच राष्ट्रनिष्ठ परंपरेला अनुसरून महाविद्यालयात ‘क्रांती सप्ताह’ अत्यंत उत्साहात व अभिमानाने आचरण्याचा दृढ निर्धार नुकताच करण्यात आला होता.
स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडांत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, मातृभूमीसाठी हसतहसत फासावर जाणाऱ्या किंवा रक्ताचे पाणी करणाऱ्या थोर क्रांतिकारकांचे अफाट देशप्रेम, त्यांचा अभूतपूर्व त्याग आणि त्यांचा खडतर संघर्ष नव्या पिढीच्या मनावर कोरून त्यांच्यात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे म्हणजेच ‘क्रांती सप्ताह’ होय. हा सप्ताह केवळ एक उत्सव नसून, आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा ज्वलंत इतिहास, थोर पुरुषांचे बलिदान आणि त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्याचे एक पवित्र माध्यम आहे. आजच्या काळात युवकांमध्ये देशप्रेम रुजावे, त्यांनी देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे आणि संकटांशी सामना करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी अशा सप्ताहांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या राष्ट्रव्यापी विचारातून प्रेरणाचा आदर्श घेऊन, महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गाने व प्राचार्यांनी या सप्ताहात दररोज एका महान क्रांतिकारक वीराचा प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थिनींसमोर उलगडून देशसेवेचा आणि बलिदानाचा एक अखंड जागर मांडण्याचा अत्यंत स्तुत्य संकल्प केला आहे. या संकल्पानुसार, दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी कन्नड विषयाचे प्राध्यापक श्री. आर. व्ही. मरीतमनवर यांनी अंगावर काटा आणणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या संघर्षमय जीवनाचा पट विद्यार्थिनींसमोर मांडला. मातृभूमीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध रणसंग्राम करणाऱ्या झाशीच्या रानीच्या असीम धैर्याने आणि अफाट त्यागाने विद्यार्थिनींचे मन देशप्रेमाने भारून गेले. या मालिकेत दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी कॉमर्स विभागाचे प्रा. श्री. पुंडलिक कर्लेकर यांनी आझाद हिंद फौजेचे संस्थापक, महापराक्रमी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अथांग देशप्रेम, त्यांचा लढाऊ बाणा आणि अजोड संघर्षाचा इतिहास विद्यार्थिनींसमोर उलगडून दाखविला. नेताजींच्या या ओघवत्या आणि प्रेरणादायी इतिहासानंतर, दिनांक 8 ऑगस्ट रोजी इतिहासाच्या अभ्यासक प्रा. वनिता गावडे या शहीद भगतसिंग यांच्या क्रांतीकार्याचा आणि हसत-हसत फासावर जाण्याच्या असीम त्यागाचा इतिहास मांडणार आहेत,10 ऑगस्ट रोजी हिंदी विषयाच्या प्रा. मंगल देसाई या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वराज्य आणि स्वदेशीच्या विचारांचा जागर मांडणार आहेत, तर 11 ऑगस्ट रोजी मराठी विषयाच्या प्रा. सुनिता कणबरकर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानमधील सश्रम कारावास आणि प्रखर राष्ट्रभक्तीवर प्रकाश टाकतील. दिनांक 12 ऑगस्ट रोजी राज्यशास्त्र विषयाच्या प्रा. जयश्री शिवटणकर या चंद्रशेखर आझाद यांच्या निधड्या छातीची आणि शेवटच्या गोळीपर्यंतच्या संघर्षाची गाथा विद्यार्थिंनी पुढे ठेवणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी इंग्रजी विषयाचे प्रा. नितीन देसाई हे राजगुरू यांच्या क्रांतीकार्यावर तसेच समाजशास्त्र विषयाचे प्रा.नरसाप्पा पाटील हे तात्या टोपे यांच्या 1857 च्या गनिमी काव्याच्या लढाऊ इतिहासावर भाष्य करतील. शेवटी 14 ऑगस्ट रोजी अर्थशास्त्र विषयाचे प्रा.तात्याजी जाधव हे शहीद सुखदेव यांच्या बलिदानाचा इतिहास मांडणार असून, या मालिकेतील अद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावाची यशोगाथा प्राचार्य अरविंद पाटील मांडून या क्रांती सप्ताहाचा समारोप करणार आहेत. याच बरोबर या उपक्रमांतर्गत एक अभिप्राय पेटी ठेवण्यात आली असून आपण ऐकलेल्या व्याख्यांनाच्या नोंदी लेखी स्वरूपात मांडून त्या अभिप्राय पेटीत टाकण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून उत्तम अभिप्राय बक्षिस पात्र ठरणार आहेत.
म.मं ताराराणी महाविद्यालयाचा हा क्रांतिकारी उपक्रम केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नसून, विद्यार्थिनींच्या मनात देशभक्ती, कर्तव्यकठोरता आणि निधड्या छातीची जिद्द निर्माण करणारा एक सुवर्णकाळ ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta