Saturday , October 24 2026
Breaking News

शहर समितीच्या अध्यक्षपदाचा निर्णय कधी?

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहर समितीचे अध्यक्षपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. १७ मार्च रोजी तत्कालीन अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी अद्याप भरून काढण्यात आलेली नाही. सीमाप्रश्नाच्या लढ्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असलेल्या शहर समितीला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याबाबत इतका विलंब का होत आहे, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. अध्यक्ष निवडण्याची गरज पदाधिकाऱ्यांना वाटत नाही की, नव्या नेतृत्वाची निवड करण्याबाबत एकमत होत नाही, याचे उत्तर समितीच्या नेतृत्वाने देण्याची गरज आहे.

शहर समितीच्या नेतृत्वाचा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून दीपक दळवी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे समितीच्या कामकाजावर मर्यादा येत असल्याची चर्चा होती. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी समितीची पुनर्रचना करून नवी कार्यकारिणी निवडण्याची मागणी केली होती. मात्र, दळवी हयात असताना अध्यक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुनर्रचनेचा विषय पुढे सरकला नाही. आता दळवी यांच्या निधनानंतरही परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही. अध्यक्षपद रिक्त होऊन आठ महिने उलटले, तरी नव्या अध्यक्षाची निवड किंवा समितीच्या पुनर्रचनेबाबत ठोस निर्णय झाल्याचे दिसत नाही.

पदाधिकाऱ्यांचे मौन, कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न

शहर समितीच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची? अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोण पुढाकार घेणार? निवडीसाठी काही अडचणी असतील, तर त्या कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात काय अडचण आहे? आणि पुनर्रचना आवश्यक वाटत नसेल, तर त्यामागची कारणे तरी स्पष्ट केली जाणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

संघटनेतील महत्त्वाच्या पदावरील नियुक्ती दीर्घकाळ रखडल्यास कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. शहर समितीच्या कामकाजाचे नियोजन, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि सीमाप्रश्नाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची स्पष्ट व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा विषय केवळ एका पदापुरता मर्यादित नसून, संघटनेच्या भविष्यातील कार्यपद्धतीशी संबंधित आहे.

जुन्या भूमिकांना चिकटून राहायचे की नव्या नेतृत्वाला संधी द्यायची?

दीपक दळवी यांच्या निधनानंतर शहर समितीची पुनर्रचना करण्याची संधी निर्माण झाली आहे. या प्रक्रियेत अनुभवी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि नव्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचा विचार होऊ शकतो. मात्र, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पुनर्रचना म्हणजे केवळ अध्यक्ष बदलणे नव्हे; तर समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा निश्चित करणे होय.

सीमाप्रश्नाचा लढा सातत्याने पुढे नेण्यासाठी संघटनेत स्पष्ट नेतृत्व, समन्वय आणि निर्णयक्षमता आवश्यक आहे. अशा वेळी अध्यक्षपदाचा निर्णय अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहणे योग्य आहे का, याचा विचार पदाधिकाऱ्यांनी करायला हवा. केवळ नियुक्तीचा विषय पुढे ढकलण्याऐवजी निवडीची प्रक्रिया, संभाव्य उमेदवार आणि पुनर्रचनेबाबतची भूमिका कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणे अधिक महत्त्वाचे आहे.

पदाधिकाऱ्यांनी आता उत्तर द्यावे!

शहर समितीला अध्यक्ष देण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? अध्यक्ष निवडीसाठी बैठक कधी होणार? पुनर्रचनेची मागणी मान्य आहे की ती अमान्य आहे? निर्णय होत नसेल, तर त्यामागील अडचणी कोणत्या? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या विषयावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

हे प्रश्न उपस्थित करणारे कार्यकर्ते संघटनेच्या विरोधात आहेत, असे समजण्याचे कारण नाही. संघटनेचे काम अधिक प्रभावी व्हावे, नेतृत्वाबाबतचा संभ्रम दूर व्हावा आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा मिळावी, हीच त्यामागील अपेक्षा असू शकते. त्यामुळे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्ट उत्तरे देणे गरजेचे आहे.

आठ महिन्यांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद हा केवळ प्रशासकीय विलंबाचा विषय नाही; तो शहर समितीच्या निर्णयप्रक्रियेचा आणि संघटनात्मक प्राधान्यांचा प्रश्न बनला आहे. आता तरी पदाधिकारी पुढाकार घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करणार, की शहर समितीचा नेतृत्वाचा प्रश्न आणखी काही महिने अनुत्तरित राहणार, याकडे मराठी भाषिक आणि समितीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

———————————————————–

येत्या महिनाभरात अध्यक्ष निवड होईल : प्रकाश मरगाळे

दि. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या शहर समितीच्या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एका समिती कार्यकर्त्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, बैठकीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगळे यांनी येत्या महिनाभरात अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच, शहर समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा अधिकार सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांना देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक २५ ऑक्टोबरला

Spread the love बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन तसेच आगामी तालुका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *