

दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप
निपाणी (वार्ता) : व्रत- वैकल्यांचा, सण-उत्सवांचा व हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या हिंदू-मराठी पंचांगातील श्रावण महिन्यास सुरवात झाली आहे. आता महिनाभर सण-उत्सवांची रेलचेल राहणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी (ता.१७) शिवालये भाविकांनी फुलून गेली होती. यावर्षी चार श्रावणी सोमवार आले आहेत.
सोमवारी (ता.१७) सकाळी नितीन गुरव यांच्या पौरोहित्याखाली श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांच्या हस्ते महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात मूर्तीसह शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनाची सोय करण्यात आली होती.
मल्लिकार्जुन गडकरी आणि राजू किल्लेदार यांच्यातर्फे शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रावणानिमित्त माजी सभापती सुनील पाटील आणि हालशुगरच्या उपाध्यक्ष गीता पाटील यांच्यातर्फे फुलांची आरास करण्यात आली होती.
यावेळी सुनील पाटील, चंद्रकांत कोठीवाले, संजय मोळवाडे, बाळासाहेब देसाई -सरकार, मल्लिकार्जुन गडकरी, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, प्रकाश पणदे, सदानंद चंद्रकुडे, रवी चंद्रकुडे, इराण्णा शिरगावे, शिवकांत चंद्रकुडे, बाळासाहेब ठाकरे, राजू गुणके, विजय चंद्रकडे, महेश चंद्रकुडे, रोहित पाटील, दयानंद कोठीवाले, ॲड. महेश दिवाण, वज्रकांत सदलगे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
याशिवाय मंगळवार पेठेतील महादेव मंदिरातही पहाटे अभिषेक आणि पूजा घालण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर शिप्पुर येथील रामलिंग मंदिरात पहाटेपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथेही निपाणी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
या महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात पूजा केली जात आहे. दहीहंडी, गोपाळकाला, रक्षाबंधन, असे अनेक सण या महिन्यातच आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात प्रसिद्ध शिवालयांत भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta