Monday , August 17 2026
Breaking News

स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा दुर्गम जंगलातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Spread the love

 

बेळगाव : स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना, फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मात्र या राष्ट्रीय सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत दुर्गम जंगलभागातील विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली. तिलारी परिसरातील स्वप्नवेल येथील धनगरवाडी, धामणे (एस) येथील सरकारी मराठी लोअर प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाचे साहित्य वितरित करण्यात आले.

घनदाट जंगल, सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, खराब रस्ते आणि अधूनमधून गावाच्या परिसरात दिसणारे वन्यप्राणी अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या वाडीतील मुले शिक्षण घेत आहेत. अवघ्या वीस घरांची ही वाडी असून, एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतची ११ मुले शिक्षण घेतात. पाचवीपुढील शिक्षणासाठी याच जंगलातून वाट काढत काही विद्यार्थी दररोज तब्बल आठ किलोमीटर पायी प्रवास करतात.

अडचणींचा डोंगर समोर असतानाही या चिमुकल्यांच्या शिक्षणाची जिद्द मात्र कायम आहे. परिस्थितीशी दोन हात करत ही मुले आनंदाने शिक्षण घेत असून, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांच्या या संघर्षाची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. सावंत आणि कुद्रेमनी मराठी शाळेचे मुख्याध्यापक केदारी गुंजीकर यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेत फेसबुक फ्रेंड्स सर्कलने तत्परतेने विविध साहित्याची जुळवाजुळव केली. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम रस्त्यांची पर्वा न करता टीम थेट शाळेपर्यंत पोहोचली आणि विद्यार्थ्यांसह शाळेसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण केले.

यामध्ये २० लिटर इंटिरियर पेंट, टी-शर्ट, ट्रॅकसूट, ट्रॅक पँट, रेनकोट, सँडल्स, शैक्षणिक साहित्याचे किट, १०० ग्रंथालयीन पुस्तके, ग्रंथालयासाठी ट्रंक, फ्लोअर कार्पेट, भोजनासाठी कार्पेट तसेच विद्यार्थ्यांसाठी मिठाई यांचा समावेश होता.

हे साहित्य पाहताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद त्यांच्या आयुष्यातील या भेटीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. केवळ साहित्याचे वाटप न करता ‘दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाची ज्योत विझू देऊ नका’, असा संवेदनशील संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शिक्षण, वाचन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी लोटस हॉस्पिटल, बेळगावचे प्रमुख डॉ. अनिल पाटील, लोकमान्य ग्रंथालय, लोकमान्य बाल ग्रंथालय, एक्स्पर्ट व्हॉल्वस अँड इक्विपमेंट्स, प्रकाश भजंत्री, हरीश तेरगावकर, अजित कुलकर्णी, कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, दिनेश कोल्हापुरे तसेच फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांचे सहकार्य लाभले.

दुर्गम जंगलातील चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोहोचलेली ही मदत म्हणजे केवळ साहित्याची भेट नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेले बळ आणि शिक्षणाच्या वाटेवर पेटवलेली आशेची नवी ज्योत ठरली.

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी दिवशीच विषारी सापाचा दंश; रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

Spread the love  रायबाग : शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *