

निपाणी (वार्ता) : भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गळतगा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला तक्षशिला बुद्ध विहार सेवा संघ गळतगा यांचे सहकार्य लाभले.
भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. ते म्हणाले स्मशानभूमी म्हणजे केवळ अंतिम संस्काराची जागा नव्हे. हा परिसरही हिरवागार, स्वच्छ आणि निसर्गरम्य असला पाहिजे. देशी वृक्षांची लागवड करून पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. संविधान केवळ पुस्तकात न ठेवता ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोच करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
तक्षशिला बुद्ध विहार परिसरातही म् वृक्षारोपण करून शांततेसोबत पक्ष्यांचा अधिवास निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात माजी सैनिक सैनिकरत्न पुरस्कार विजेते राजेंद्र चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय नामदेव चौगुले यांच्या कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. राजेंद्र चौगुले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हा माझा झालेला सन्मान नसून भारतीय सैनिकांचा सन्मान असल्याचे सांगितले.
यावेळी कुमार कांबळे, काकासो कट्टी, रोशन जाधव, चंद्रकांत रणोदे, कांतेश माने, भीमराव पूर्वे, राहुल कांबळे, राजेंद्र कमतनूरे, भीमराव माने, संतोष हुनसे, राजेंद्र माळगे, तम्मान्ना वराळे, प्रवीण विजयनगरे यांच्यासह तक्षशिला बुद्ध विहार सेवा संघाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta